राज्य सरकारकडून डिझाइन तयार
गंगापूर, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महत्त्वाच्या महामार्गावरील गंगापूर फाटा (भेंडाळा) येथे लवकरच उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, राज्य सरकारने या प्रकल्पाचे डिझाइन तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या उड्डाणपुलामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गंगापूर फाटा हा छ. संभाजीनगर, पुणे, अहिल्यादेवी नगर, बिडकीन एमआयडीसी तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा चौक आहे. दररोज हजारो लहान-मोठी वाहने या मार्गावरून धावतात. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून, अनेक गंभीर अपघातही घडले आहेत.
उड्डाणपुलाचे प्राथमिक डिझाइन तयार झाले असून पुढील प्रशासकीय मंजुरी, निधी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. दरम्यान, या परिसरात इतर अभियांत्रिकी बाबींची तपासणी करून सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे पालन केले जाण्याची अपेक्षा आहे. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर गंगापूर फाट्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांना आळा बसेल आणि छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावरील प्रवास अधिक गतिमान होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
उड्डाणपूलामुळे परिसरातील जमिनींच्या किमती कमी होणार?
गंगापूर फाटा (भेंडाळा) येथे प्रस्तावित उड्डाणपुलाचे डिझाइन तयार झाल्यानंतर परिसरातील शेतीच्या जमिनींच्या किमतीवर त्याचा परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे. उड्डाणपुलाच्या आराखड्यामुळे काही जमिनी प्रकल्पासाठी संपादित होऊ शकतात किंवा प्रवेशमार्गात बदल होऊ शकतो. त्यामुळे काही ठिकाणी जमिनींच्या बाजारभावात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













